डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे उदघाटन
जळगाव ;- विद्याथ्र्यांनी यश प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असून प्राप्त झालेल्या यशाद्वारे समाज आणि कुटुंबाच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन आज दि. 26 जून रोजी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर यावलचे सहायक प्रकल्प अधिकारी एस.एस.चौधरी, केंद्राचे समन्वयक प्रा.अजय सुरवाडे उपस्थित होते. प्रा.माहुलीकर म्हणाले की, या केंद्राचे हे तिसरे वर्ष असून 25 प्रशिक्षण विद्यार्थी संख्या आहे. या भागात तीन जिल्हे असून नंदूरबारचा आदिवासी बहुल भाग आहे. या भागातील पहिली पिढी आता विद्यापीठापर्यंत शिक्षणासाठी पोहचत आहेत. राजर्षि शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे तळागाळातील विद्यार्थी शिकू लागला आहे. या केंद्रातून चांगले अधिकारी निर्माण व्हावेत अशी अपेक्षा प्रा.माहुलीकर यांनी व्यक्त केली. सहायक प्रकल्प अधिकारी श्री.एस.एस.चौधरी यांनी आदिवासींसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेशित विद्याथ्र्यांना आदिवासी विकास कार्यालयाकडून सहकार्य केले जाईल असेही सांगितले. केंद्राचे समन्वयक प्रा.अजय सुरवाडे यांनी केंद्राचा आढावा सादर केला. प्रा.दीपक सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.