मुंबई, दि. 2 : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. चैत्यभूमी येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला ज्ञान दिले आणि जागरूक केले. या जागरूकतेला अधिक बळकटी देण्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण करुया, असेही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय गिरकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, बेस्ट’च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, तसेच विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चैत्यभूमी परिसरात योग्य मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दादर व आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करावे. अनुयायांना मार्गदर्शन मिळावे यासाठी जागोजागी सूचनाफलक लावावेत. तसेच, नागरिकांना सुलभ प्रवासासाठी बेस्टतर्फे अतिरिक्त बससेवा उपलब्ध ठेवावी. या बैठकीच्या निमित्ताने अनेक चांगल्या व उपयुक्त सूचना प्राप्त होतात. यामुळे मूलभूत बाबींवर लक्ष देत दरवर्षी अधिक चांगले काम करता येते, तसेच काही उणीवा राहिल्या असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करता येतो. उत्तम नियोजन आणि समन्वयासाठी ही बैठक आयोजित केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बैठकीत येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था, सुरक्षेची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बस सेवा, भोजन व्यवस्था, चैत्यभूमी परिसरात वॉटरप्रूफ मंडप, स्वच्छतागृहे, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, पुष्पवृष्टी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सर्व सोयीसुविधा यांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण तसेच माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.











