जळगाव : येथील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज परिसरात सुरू असलेल्या ॲग्रोवर्ल्डतर्फे आयोजित कृषी प्रदर्शनाला सलग तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाचा उद्या (सोमवारी) समारोप आहे. आधुनिक शेतीत उपयोगी पडणारी नवीन यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, शाश्वत उत्पादनाच्या पद्धती पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्रोवर्ल्डच्या आयोजकांनी केले आहे.

जळगाव – शेतकऱ्यांची तरुण सुशिक्षित मुले शेतीत येत आहेत. हे सकारात्मक चित्र असलं तरी मध्यस्थ्यांच्या साखळीमुळे शेतमालाला अनेकदा अपेक्षित दर मिळत नाही. तेव्हा शेतकऱ्यांनीच आता कृषी उद्योजक म्हणून पुढे यावे आपला शेतमाल स्वतःच कसा विक्री करता येईल याचे नियोजन करावे, असे आवाहन केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अंमळकर यांनी केले.
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात रविवारी जळगाव जिल्ह्यातील कृषी उद्योजिका महिला व गटांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकी पाटील, माजी जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे हरेश्वर भोई, जिल्हा विकास संसाधनव्यक्ती समाधान पाटील, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीराम पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकाच छताखाली शेतीविषयक तंत्रज्ञान पाहण्यास मिळते. यामुळे जळगाव जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांना शेतीतील बदल, नवीन तंत्रज्ञानाची माहिती तत्काळ होत असल्याचेही नमूद केले.
*किचन गार्डन ते मका हार्वेस्टर यंत्र मुख्य आकर्षण*
कृषी यंत्र व अवजारांच्या 45 स्टॉलसह प्रदर्शनात 210 हून अधिक स्टॉल्स आहेत. सध्या मजूरटंचाईमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी येथे प्रदर्शित मका हार्वेस्टर हे यंत्र वरदान ठरणार आहे. मका हार्वेस्टर मशीन एका दिवसात 8-10 एकर मका हार्वेस्ट करते. प्रदर्शनात लागवडीपासून काढणीपर्यंतचे श्रम कमी करणाऱ्या या यंत्राचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. यासोबतच बी लागवड, फवारणी, नांगरणी, तणनाशन, काढणीपर्यंतची विविध यंत्रे शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून विविध कंपन्यांनी प्रदर्शनात मांडली आहेत. भर पावसाळ्यात शेतात काम करणे अवघड असते. त्यासाठी आवश्यक असलेले हाय व्हील्सचे स्पेशल चाके येथे उपलब्ध असून त्याद्वारे फवारणी, पिक काढणी करू शकतो. वाफसा नसलेल्या शेतात देखील हे उपकरण उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
प्रदर्शनात किचन गार्डन टूल्सची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. ग्रामीण भागात वाढत्या जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी झटका मशिन हा पर्याय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असून प्रदर्शनात या स्टॉलला विशेष गर्दी दिसून आली. इफ्कोतर्फे ड्रोन फवारणाची प्रत्याक्षिक करण्यात आले. जमिनीचा पीएच स्तर वाढून जमीन क्षारयुक्त होत आहे. परिणामी जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता घटत चालली आहे. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून यंदाच्या कृषी प्रदर्शनात ‘शेतासाठी आरओ प्रणाली’ शेतकऱ्यांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरली आहे.
*कृषी उद्योजिका पुरस्कार्थी*
उज्वला दत्तात्रय पाटील (रा. खेडगाव नंदीचे), अश्विनी विजय पाटील (मु. पो. पिंप्रीनांदू), अश्विनी राहुल बारी (जळगाव), मनीषा कैलास माळी (धरणगाव), कल्पना आकाश बडगुजर (पिंपळगाव खु), ममता किरण चौधरी (जळगाव)
ॲग्रोवर्ल्ड कृषी जोडव्यवसाय पुरस्कार
संगीता आत्माराम महाजन (आडगाव),
ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी पर्यटन पुरस्कार
शिल्पा यशवंत महाजन (नागन खु)
ॲग्रोवर्ल्ड सेवेचे ठाई तत्पर
पूर्वजा सुरेश कुमावत (शेंदुर्णी), किरण एकनाथ तायडे (जळगाव)
ॲग्रोवर्ल्ड आदर्श महिला गट शेती पुरस्कार
भूमी माता महिला शेतकरी गट, चिमणपुरी.
जय जिजाऊ महिला शेतकरी गट, पाटखेडा.
स्वामी समर्थ शेतकरी गट गाव, जांभूळ.
गायत्री महिला शेतकरी गट, पातोंडा.










