जळगाव,(प्रतिनिधी)- राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने जाहीर केलेला ११ नोव्हेंबर २०२५ रोजीचा लाक्षणिक संप तूर्त स्थगित करण्यात आला आहे. तथापि, संघटनेने त्या दिवशी दुपारच्या भोजन सुट्टीत सर्व सरकारी कार्यालयांसमोर तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस योगेश नन्नवरे यांनी माहिती दिली.
राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून सरकारवर दबाव आणण्यासाठी विविध आंदोलनं करण्यात आली. सरकारने विधानसभेत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले असले तरी, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे.
दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत, राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक तथा राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस मा.विश्वास काटकर व अध्यक्ष मा.अशोक दगडे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा विचार करून संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत निर्णय घेण्यात आला की, राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान वाटपाचे काम सुरू आहे, तसेच नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने संपाच्या कृतीत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारच्या भोजन सुट्टीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच आपल्या कार्यालयासमोर एक तास उग्र निदर्शने करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटना व संयुक्त समन्वय समितीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना या निदर्शनांत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयाबाबत जळगाव जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष – मगन पाटील, सरचिटणीस – योगेश नन्नवरे, कार्याध्यक्ष – वासुदेव जगताप, कोषाध्यक्ष – घनःश्याम चौधरी आणि राज्य संघटक तसेच उपाध्यक्ष – अमर परदेशी यांनी माहिती दिली आहे.
🔹 “जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत लढा सुरूच राहील. सरकारी कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत कुठलाही तडजोडीचा प्रश्न नाही,” असे योगेश नन्नवरे यांनी सांगितले.
“राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा विजय असो… हम सब एक है!” या घोषणांनी पुन्हा एकदा कर्मचारी वर्गात ऊर्जेची लाट निर्माण केली आहे.










