विचारवंत अभिनेते शरद पोंक्षे यांचे प्रतिपादन
सावरकर विचार दर्शन व्याख्यानात रसिक श्रोते अंतर्मुख : श्रोत्यांची उसळली तोबा गर्दी
चाळीसगाव – एखादी असत्य गोष्ट शंभर वेळा सांगितली की ती सत्य वाटायला लागते तद्वतच सावरकरांबद्दल काही चुकीच्या गोष्टी तोडून मोडून समाजासमोर आल्याने त्यांच्या जाज्वल्य विचार समाजासमोर प्रभावी पणे आला नाही ही खेदाची बाब आहे.एकाच भगव्या खाली हे हिंदू राष्ट्र एकसंघ व्हावे यासाठी ते झटले.कारण या भूतलावर कोणीच निधर्मी नाही यांवर त्यांचा ठाम विश्वास होता माझा हिंदू धर्म सर्वाना सामावून घेणारा आहे.सहिष्णुता हा हिंदूंचा डी एन ए आहे. तसेच सावरकरांनी जातीपातीच्या भिंती तोडण्याचे काम केले.त्यांचा खरा इतिहास अधिक प्रकर्षाने समाजासमोर आणण्याची गरज असून यासाठी अशा व्याख्यानमालेमधून सावरकरांच्या विचारांची खरी ओळख करता येते याचा मनस्वी आनंद आहे. सावरकर एक विचारसरणी असून प्रखर हिंदू विचार घेऊन जगण्याची पद्धत आहे असे रोखठोक प्रतिपादन जेष्ठ अभिनेते विचारवंत शरद पोंक्षे यांनी केले आहे. ते आज खासदार उन्मेश दादा पाटील व उमंग परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचे शुभारंभाचे पहिले पुष्प गुंफतांना बोलत होते.उमंग व्याख्यान मालेचे हे नववे वर्ष असून आज अंधशाळेच्या मैदानावर हजारोंच्या संख्येने रसिक उपस्थित होते.
सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्तविकातून खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्याख्यानमालेची सर्वाना उत्सुकता असून ती कधी सुरू होणार अनेकांनी याबाबत विचारणा केली. याचा आनंद आहे असे सांगून त्यांनी व्याख्यानमालेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा मांडला. वक्त्यांचा परिचय राजेश ठोबरे यांनी करून दिला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा आशालता चव्हाण, गटनेते संजय पाटील, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे,प्रीतमदास रावलाणी,जेष्ठ रंगकर्मी डॉ मुकुंद करंबेळकर, हेमांगी काकू पुर्णपात्रे,उमंग परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील, माजी सभापती स्मितल बोरसे, नगरसेवक सुरेश स्वार,डॉ. अमित महाजन,प्रा. मधुकर कासार,प्रा. राहूल कुळकर्णी,लालचंद बजाज यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या मान्यवरांचे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी छप्पन वर्षीय मॅरेथॉनपटू देविदास राठोड, “एकदा काय झालं” या चित्रपटातील मुख्य भूमिका निभावणारे अभिनेता अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे,जागतिक रेकॉर्ड करणारी पर्यावरण संवर्धनासाठी पंचवीस हजार विद्यार्थ्यांची रॅलीचे संयोजक नाट्यकर्मी अश्विन खैरनार,मानद वन्य जीव रक्षक राजेश ठोबरे यांचा सत्कार खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. वक्ते शरद पोंक्षे पुढे म्हणाले नवीन घर घेतले की त्याला लोखंडी दरवाजा खिडकी आपण बसवितो आपल्या परिवारातील चार चौघासाठी एवढी सुरक्षेची आपण काळजी घेतो.तशीच देशाच्या सीमेची काळजी घ्यावी आधी देशाच्या सीमा सुरक्षित करा असे सावरकर यांचे ठाम मत होते. त्यांचे म्हणणे किती गरजेचे होते ते आता आपला देशाच्या बजेट पैकी साठ टक्के पैसा सिमा रक्षणावर खर्च होताना सर्वाना पटते आहे असे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. अहिंसेचे आधार घेणारा दुबळा राजा प्रजेचे रक्षण करू शकत नाही तर शस्त्र संपन्न राजाचं देशाचे रक्षण करू शकतो. शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बरोबर जिजाऊंनी आपले पती ज्या राजाच्या समोर उभा राहून नोकरी करतो त्याच राजाच्या जुलमी राजवटी विरुद्ध आपल्या शिवबाला लढायला शिकविणारी राष्ट्रमाता जिजाऊंचा इतिहास आजच्या शिक्षण व्यवस्थेत शिकविला तर अनेक शिवबा आजच्या मातांच्या उदरी जन्म घेतील परंतु आजची इंग्रजी शिक्षण पद्धतीतून संस्कार हद्दपार होत असून मराठी अस्मिता लोप पावत असल्याचे दुःख होते.सात नद्यांची नावे घेतल्या शिवाय हिंदू धर्माची पूजा पूर्ण होत नाही.महामानव ही देखील माणसे होती त्यामुळे त्यांच्या कडून काही चुका झाल्या असतील म्हणून त्यांनी एकमेकांचा तिरस्कार केला नाही गांधी सावरकर एकमेकांच्या चांगल्या कामाचे कौतुक करीत गांधींनी घराघरात स्वातंत्र्य पोहचविले याचे जाहीर कौतुक सावरकरांनी केले.
तर कस्तुरबा गांधी गांधीजींना घेऊन सावरकर यांना भेटल्या. मात्र आजच्या महामानवांना आपण रंग पक्ष जाती पातिच्या भिंती मध्ये वाटून घेतल्याने देशाचे नुकसान होत आहे. आपल्या घरात महापुरुषांची छायाचित्र लावा निदान ते बघून येणाऱ्या नव्या पिढीला त्यांचा इतिहास वाचण्याची ओढ लागेल.रामराज्य आणि शिवशाही यांची उदाहरणे देऊन त्यांनी सुमारे दोन तास प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत भारदस्त आवाजाच्या चढउताराने श्रोत्यांना गुलाबी थंडीत विचारांची उब देऊन गेले.सूत्रसंचालन प्रा. विजय गर्गे यांनी तर आभार भूषण साळुंखे यांनी मानले.