जळगाव, जळगाव जिल्ह्यात केळी हे प्रमुख फळपिक असून सुमारे ६५,००० ते ७०,००० हेक्टर क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केली जाते. केळी करपा हा केळी पिकावरील महत्त्वाचा बुरशीजन्य रोग असून या रोगामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर केळी पिकाचे नुकसान होते.

रोगाची लक्षणे:- या रोगाची सुरुवात खालच्या जुन्या पानांवर होते, प्रादुर्भावाच्या सुरुवातीस पानांवर लहान लांबट व गोलाकार पिवळसर ठिपके व मध्यम भागी काळसर ठिपके दिसून येतात. त्यानंतर पानाच्या उपशिरांच्या दरम्यान त्याचा आकार वाढत जाऊन पिवळ्या रेषेच्या स्वरूपात दिसतात. कालांतराने हे ठिपके मोठ्या ठिपक्यांमध्ये रूपांतरीत होतात पूर्ण वाढ झालेल्या ठिपक्यांचा रंग तपकिरी काळपट असतो तर ठिपक्याभोवती पिवळसर रंगाची कालय दिसून येते करपा रोगाची लक्षणे सर्वसाधारणपणे पानाच्या कडांवर आणि शेड्यावर विशेषत आढळून येतात रोगास अनुकूल हवामान दिर्घकाळ टिकून राहिल्यास ठिपके एकमेकात मिसळून पाने टोकाकडून करपतात जास्त प्रमाणात तिव्रता असल्यास संपूर्ण पान सुकते, एकूण कार्यक्षम पानांची संख्या कमी होते व त्याचा परिणाम केळी उत्पादनावर व गुणवत्तेवर होता
रोगाचा प्रसार :- करपा रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगट कंदामार्फत आणि रोपांमार्फत होतो या बुरशीचे लैंगिक व अलैंगिक बिजाणू पानाच्या खालच्या बाजुने पर्णरंध्राच्या पेशीतून आत शिरून रोगाची लागण करतात. या बिजाणूंची निर्मिती ओलसर वातावरणात सतत चालू असते आणि त्याचा प्रसार पानांवर पडणारा पाऊस अथवा दवबिंदूद्वारे होत असतो.

करपा रोगाच्या वाढीस अनुकूल बाबी रोगग्रस्त बागेतील कंदाचा वापर, शिफारशीत कंद प्रक्रियेचा अभाव, पोक फेरपालटीचा अभाव, शिफारशीपेक्षा कमी अंतरावर केळी पिकाची लागवड करणे, बागेमध्ये पाण्याचा अयोग्य निचरा, बागेत सर्वसाधारण स्वच्छतेचा अभाव, अन्नद्रव्यांचा असंतुलीत वापर
करपा रोगामुळे होणारे नुकसान: झाडावरील कार्यक्षम पानांची संख्या झपाट्याने कमी होऊन अन्न निर्मिती प्रक्रियेत बाधा निर्माण होते, पुरेशा पोषणाअभावी फळांची योग्य वाढ न होता फळे आकाराने लहान राहतात, फळांमध्ये गर भरत नाही तसेच फळांचा दर्जा खालावतो रोगाची तीव्रता वाढल्यास घडवाढीवर विपरित परिणाम होऊन फळे अपरिपक्व अवस्थेत पिकु लागतात, करपा रोगामुळे एकूण उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होऊन मोठे आधिक नुकसान संभवते.
प्रतिबंधात्मक उपाय : शिफारस केलेल्या अंतरावरच केळी पिकाची लागवड करावी (१.५ x १.५ मी.), लागवडीपूर्वी कंद प्रक्रिया करावी. कंद प्रक्रिया करण्यासाठी १०० लीटर पाण्यात १५० ग्रॅम असिफेट १०० ग्रॅम कार्बन्डेझिम मिसळून तयार केलेल्या द्रावणात कंद किमान अर्धातास बुडवून ठेवावेत, पावसाळ्यात बागेत पाणी साचून राहणार नाही व पाण्याचा योग्य निचरा होईल याकडे लक्ष द्यावे. केळीची बाग नेहमी तणमुक्त व स्वच्छ ठेवावी, केळी पिकास शिफारस केलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा वेळापत्रकानुसार द्यावी, रोगाची लागण दिसतांच फक्त रोगग्रस्त पानांचा भाग किंवा संपूर्ण रोगग्रस्त पान त्वरीत कापून बागेबाहेर नेवून जाळून नष्ट करावे.

निवारणात्मक उपाय: केळी बागांची स्वच्छता सामुदायिकरित्या करावी. तसेच बुरशीनाशकांची फवारणी मोहोम राबवावी, करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसताच कार्वन्डेझिम १० ग्रॅम किंवा प्रोपिकोन्याझॉल १० ग्रॅम किंवा ट्रायडेमार्फ १० ग्रॅम या बुरशीनाशकांची १० लीटर पाण्यात स्टिकरसह मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर ७ ते २१ दिवसांच्या अंतराने रोगाच्या तिव्रतेनुसार ३ ते ४ फवारण्या घ्याव्यात. तसेच सुरवातीच्या फवारण्या नंतर रोगाच्या तिव्रतेनुसार प्रति १० लीटर पाण्यात प्रोपिकोन्याझॉल ५ मि.ली. किंवा कार्बन्डेझिम ५ ग्रॅम + १०० मि.ली. मिनरल ऑईलच्या २ ते ३ फवारण्या दर २ ते ३ आठवड्यांच्या अंतराने कराव्यात. कंद प्रक्रियेपासून योग्य पीक व्यवस्थापन केल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो तसेच आधिक नुकसान टाळता येऊ शकते
हॉर्टसॅप योजना: फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन योजनेअंतर्गत केळी पिकावरील कीड व रोगांचे नियमितपणे साप्ताहिक निरिक्षणे कृषि विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेकडून घेतली जातात केळी पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यास आधिक नुकसान पातळीच्या वरील गावात शेतकऱ्यांना जैविक व रासायनिक किटकनाशक निविष्ठांच्या खरेदीसाठी हॉर्टसॅप योजनेतंर्गत ५० टक्के अनुदान व जास्तीत जास्त रु ७५०/- प्रति हेक्टर व प्रति शेतकरी एक हेक्टर मर्यादेत उपलब्ध करून देण्यात येते. तसेच शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या औषधांसाठी थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या (DBT) माध्यमातून अनुदान देण्यात येते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,
संकलन- जिल्हा माहिती कार्यालय,जळगाव.