उस्मानाबाद– येथे होत असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रानकवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते आज झाले. संमेलनाच्या उद्घाटनाला जाऊ नका, अशा धमकीला भीक न घालता महानोर यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सोशल मीडिया आणि फोनद्वारे संमेलनाला होणारा विरोध प्रत्यक्षात दिसला नाही.
९२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी ९३ व्या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्र सुपूर्द केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले- पाटील, प्रमुख कार्यवाह दादा गोरे, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे, पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, कवयित्री अनुराधा पाटील उपस्थित होते. संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अक्षयकुमार काळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले तसेच पिंपरी येथे झालेल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांचा विशेष सत्कार उस्मानाबाद येथील संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांच्या हस्ते झाला. दरम्यान, ‘साहित्य संमेलनाला जाऊ नका,’ अशी धमकी ब्राह्मण महासंघाने संमेलनाचे उद्घाटक कविवर्य ना. धों. महानोर यांना दिली होती. मात्र महानोर यांनी संमेलनाला उपस्थित राहण्याची ठाम भूमिका घेतली. महानोर यांना धमकी देण्यात आल्याने सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली होती.
संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राह्मण महासंघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी सुरुवातीपासून विरोध केला आहे. दिब्रिटो यांच्या निवडीनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना धमकीचे फोन आले होते. संमेलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा असून फादर दिब्रिटो, कौतिकराव ठाले-पाटील तसेच अन्य पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी सुरक्षा दिली आहे. संमेलनस्थळी जराही विरोध झाला नाही.