नवी दिल्ली – जेएनयू कॅम्पसमध्ये घुसून हिंसाचार करणारे आम्हीच होतो अशी कबुली हिंदू रक्षा दलाच्या नेत्याने दिली आहे. पिंकी चौधरी असे या नेत्याचे नाव असून त्याने हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात नकाबधारी हल्लेखोरांनी घुसून विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण केली. तसेच हॉस्टेलमध्ये सुद्धा तोडफोड करताना हिंसाचार केला. या हिंसाचारानंतर पोलिसांनी ज्यांच्यावर हल्ला झाला त्या जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष हिच्यासह 20 जणांवरच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जेएनयूत देशद्रोही कृत्य खपवून घेणार नाही -पिंकी
हिंदू रक्षा दलाचा नेता पिंकी चौधरीने मंगळवारी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. “जेएनयू देशद्रोही कृत्यांचे केंद्र बनले आहे. त्याला हिंदू रक्षा दल खपवून घेणार नाही. आम्हीच विद्यापीठाच्या परिसरात घुसलो होतो आणि त्यांच्यावर हल्ला करणारे लोक आमचेच होते.” असा दावा पिंकीने केला आहे. परंतु, पिंकीने सांगितलेले कितपथ खरे आहे याचा सध्या तपास केला जात आहे. जेएनयूमध्ये चेहरा झाकून आलेल्या हल्लेखोरांनी कशी एंट्री केली आणि ते नेमके कोण होते याचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही सुद्धा तपासले जात आहेत. 2014 मध्ये आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयावर हल्ला करून हिंदू रक्षा दल चर्चेत आला होता. या प्रकरणी या टोळीचा नेता भुपेंदर तोमरला अटकही करण्यात आली होती. दरम्यान, माध्यमांशी बोलताना पिंकीने इतर विद्यापीठात सुद्धा देशविरोधी कारवाया होत असतील तर त्यांच्यावरही हल्ले करू अशी धमकी दिली आहे. पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही.