दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक ८ फेब्रुवारी या दरम्यान पार पडणार असून मतमोजणी या ११ फेब्रुवारी रोजी दिवशी होणार आहे. आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
२२ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेची मुदत संपणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकीत १३७५० पोलिंग बूथवर जवळपास १.४६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.
पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने जबरदस्त यश मिळवत ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवला. भाजपला तीन जागांवर यश मिळाले तर काँग्रेसला खातंही उघडता आले नव्हते. राज्यात सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचे सरकार वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले. नायब राज्यपालांशी निर्णय घेण्यावरून वाद झाले होते. तर, केंद्र सरकार कामात अडथळा आणत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेकदा केला होता. दिल्लीतील जनतेची विकासाखाली फसवणूक झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर, राज्यात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात प्रचंड सुधारणा झाली असल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. यंदाच्या निवडणुकीत ‘आप’ला भाजपचे आव्हान असणार असून काँग्रेस आपली कामगिरी सुधारण्याचे प्रयत्न करणार आहे.















