जळगाव – फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात.
जिल्हा कीडा अधिकारी यांच्याकडून कीडा प्रस्ताव तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड इत्यादी प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडून दरवर्षी विभागीय मंडळाकडे दि. ३० एप्रिल पर्यंत सादर केले जातात.
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ या वर्षात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) या परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस आधी आयोजित करण्यात आल्या असून या परीक्षांचा निकाल दि. १५ मे २०२५ पर्यंत जाहीर करण्याचा मंडळाचा मानस आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेतील खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा कीडा अधिकारी यांनी दि. १५ एप्रिल २०२५ पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने पाठवावयाचे आहेत. तसेब एन.सी.सी., स्काऊट गाईड चे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी विभागीय मंडळांकडे प्रचलित पध्दतीने दि. १५ एप्रिल २०२५ पर्यंत पाठवावयाचे आहेत.
तरी याबाबत सर्व जिल्हा कीडा अधिकारी, सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मुख्याध्यापक/प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक, व सर्व संबंधित घटकांनी याची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी अशा सुचना डॉ. माधुरी सावरकर यांनी दिल्या आहेत.