कोटा – राजस्थानातील कोटा येथे डिसेंबर महिन्यात जेके लोन रुग्णालयामध्ये शंभर बालकं दगावल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे काँग्रेसवर चोहोबाजूने टीकेचा भडिमार होत असतानाच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही ही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कोटा जिल्ह्यातील जेके लोन रुग्णालयात डिसेंबर महिन्यात एकूण १०० बालकांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात ९ मुलं दगावल्याची माहितीही समोर आली आहे. २३ आणि २४ डिसेंबर रोजी अवघ्या ४८ तासांत या रुग्णालयात १० बालकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या रुग्णालयात मोठा वाद झाला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. बसपा प्रमुख मायावती यांनीही या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. मीडियानेही हे प्रकरण उचलून धरल्याने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सोनिया गांधी यांनी पक्षाचे राज्यप्रभारी अविनाश पांडे यांना बोलावून घेऊन सर्व माहिती घेतली आहे. तसेच गेहलोत सरकारने या प्रकरणावर काय पावले उचलली आहेत, त्याचीही माहिती घेण्यात आली आहे.
कोटा येथील रुग्णालयात झालेल्या बालकांच्या मृत्यूवर सोनिया गांधी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं असून याप्रकरणी गंभीरपणे कारवाई करण्याच्या सूचनाही गेहलोत यांना दिल्या आहेत. पांडे यांनी स्वत: मीडियाशी बोलताना ही माहिती दिली.














