शहर प्रतिनिधी / पाचोरा
पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती, पाचोरा व पाचोरा तालुका वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ डिसेंबर रोजी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर जी. बी. औंधकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात मुख्य न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस व्ही निमसे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण १०६ इतकी प्रकरणे निकाली होवून त्यात १ कोटी १८ लाख ८१ हजार १९९ रुपये इतकी वसुली झाली. तसेच वादपूर्व ८९७ प्रकरणांचा निपटारा होवून यात ६० लाख ५७ हजार ३५० रुपये इतकी रक्कम वसुल झाली आहे. एकूण १ कोटी ७९ लाख ३८ हजार ५४९ रुपये इतकी रक्कम वसूल झाली आहे. सदर लोक न्यायालय यशस्वी करण्याकरिता लोकन्यायालयाचे पंच अॅड. ऋषभ पाटील, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, सचिव अॅड. निलेश सूर्यवंशी, सह सचिव अॅड. अंबादास गिरी, वकिल संघाचे सर्व वरिष्ठ, कनिष्ठ विधिज्ञ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, बँक अधिकारी, कर्मचारी, बी. एस. एन. एल. अधिकारी, कर्मचारी, वीज महावितरण अधिकारी, कर्मचारी, पाचोरा व पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी तथा न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक, कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार आपल्या प्रकरणांमध्ये तडजोड करून घेण्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.