जळगाव- राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२३ पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पिक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. रब्बी हंगाम २०२४-२५ साठी पिक विमा योजनेत सहभाग सुरु करण्यात आला आहे. या विमा योजनेत भाग घेण्यासाठी केंद्र सरकारमार्फत पिक विमा पोर्टल www.pmlby.gov.in हे कार्यान्वित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकासाठी विमा उतवण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी ही मुदत ३१ मार्च २०२५ आहे.
गेल्यावर्षी रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये विमा योजनेत साधारणता ७१ लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते तर यंदा ११ डिसेंबर २०२४ अखेर राज्यात ४१ लाख विमा अर्ज दाखल झाले आहेत. १५ डिसेंबर २०२४ पर्यंत शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा आणि या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवावा असे आवाहन कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी केले आहे.