भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही सलग तिस-या वर्षी भव्य मराठी दांडीयाचे काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा,महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ आणि सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. दरवर्षी पाच दिवस चालणारा हा उपक्रम या वर्षी सात दिवस चालणार आहे. या भव्य मराठी दांडीया चा आनंद घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून यावे असे आवाहन या सर्वांनी केले.
यावेळी आ. कोटेचा म्हणाले की, मुंबईतील पहिला मराठी दांडिया भाजपाने सुरू केला. या उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून या मराठी दांडीयाला गेली दोन वर्षे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हिंदू संस्कृती जपणा-या प्रत्येकाला या मराठी दांडीया साठी दरवर्षी नि:शुल्क प्रवेश देण्यात येतो. यंदा सात दिवस रोज मराठी पेहरावात उत्तम सादरीकरण करणा-या एक महिला आणि एका पुरूषाला एक – एक आयफोन बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच गुणांकांमध्ये जर दोघांमध्ये बरोबरी झाल्यास त्या दोघांनाही एक – एक आयफोन देण्यात येईल असे आ. कोटेचा यांनी नमूद केले. या मराठी दांडीयासाठी नि:शुल्क प्रवेश पत्रिका आपले ओळख पत्र दाखवून मध्य आणि दक्षिण मुंबईतील भाजपाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध होतील अशी माहितीही आ.कोटेचा यांनी दिली. मुंबईतील पहिला मराठी दांडिया भाजपाने सुरू केला असताना याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा टोलाही आ. कोटेचा यांनी विरोधकांना लगावला.
उल्हासपूर्ण वातावरणात भव्यदिव्य मराठी दांडीयाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित रहावे असे आमंत्रण भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्रीमती वाघ यांनी दिले. चित्रपट,मालिका कलावंतांची उपस्थिती, वाद्यवृंदाचा ठेका आणि नेटके संयोजन असलेल्या या मराठी दांडीयाची रंगत न्यारी आहे असेही श्रीमती वाघ यांनी नमूद केले. अवधूत गुप्ते यांनीही मराठी दांडीयासाठी आमच्या वादकांचा हात आणि माझा गळा सज्ज आहे ,तेव्हा मराठी दांडियाच्या ठेक्यावर धमाल करण्यासाठी आणि आयफोन जिंकण्यासाठी सर्वांनी यावे असे आवाहन केले.