जळगांव – हॉटेलच्या बिलावरुन झालेल्या शाब्दीक वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याची घटना काल दुपारी झाली. या घटनेबाबत जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला मध्यरात्री हॉटेल मालकासह एकुण नऊ जणांविरुध्द रीतसर गुन्हा दाखला करण्यात आला. दरम्यान वादाचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या एका पत्रकाराला देखील बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पवन ईश्वर खरे हे व्यावसायाने वकील असून ते काल दुपारी साडेबारा वाजता जिल्हा पेठ हद्दीतील भजे गल्लीतील हॉटेल करिश्मा येथे एका पक्षकारासोबत जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण आटोपल्यानंतर त्यांचे बिल 120 रुपये झाले होते. त्यांनी वेटरला 150 रूपये देऊन उर्वरित रक्कम टीप म्हणून ठेवून घेण्यास सांगितली. या दरम्यान मागील बाकी असल्याचे चौधरी नामक काऊंटर वरील वरील कर्मचार्याने पवन खरे यांना वेटर मार्फत सांगितले. आपण सर्व रक्कम दिली असल्याचे व आपल्याकडे काही बाकी नसल्याचे पवन खरे यांनी सांगितले. बिलाच्या रकमेचा वाद हळूहळू वाढत गेला. शब्दिक चकमकीचे पर्यावसन हाणामारीत सुरु झाले. हॉटेल व्यवस्थापनाकडून हॉटेल मालक शाम भंगाळे यांचेसह चौधरी नामक कर्मचारी व इतर अशा जवळपास नऊ लोकांनी मिळून पवन खरे यांना डांबून ठेवत मारहाण सुरु केली. या घटनेची माहिती पत्रकार संतोष ढिवरे यांना समजली. या घटनेची माहिती घेण्यासाठी ते थेट हॉटेल मध्ये गेले. त्यांनी या प्रकरणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील पवन खरे यांच्यासोबत लाकडी दांडक्याने व इतर वस्तूंनी मारहाण सुरु करण्यात आली. यात दोघेही जखमी झाले.
या प्रकरणी मध्यरात्री जिल्हापेठ पोलिीस स्टेशनला गु.र.नं. 110/19 नुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार संतोष ढीवरे यांना जबर मारहाण झालेली आहे. त्यामुळे अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटना व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पत्रकार संतोष ढीवरे यांना झालेल्या बेदम मारहाण प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे दोन्ही संघटनांचे जिल्हा अध्यक्ष अनुक्रमे भगवान सोनार व प्रवीण सपकाळे यांनी सांगितले आहे.