मित्राचा वाढदिवस म्हटलं की इतर मित्रांचा आनंद गगनात माईना… असा असतो पण अशाच अशा एका मित्राचा वाढदिवसाला काही तरी थरारक करण्याच्या नादात मित्र असलेल्या सर्पमित्राने बर्थडेबॉयला गिफ्ट म्हणून वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या हातात ‘साप’ दिला, दरम्यान सापासोबत फोटो काढतांना बर्थडेबॉयला सापाने दंश केला, साप विषारी असल्याने यात त्याच्या मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे.
मित्राच्या वाढदिवशी कुणी साप गिफ्ट देतं का?
थरारक पद्धतीने साजरा करणं एका सर्पमित्राला चांगलंच महागात पडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वाढदिवसाच्या दिवशी हातात विषारी साप घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने युवकाचा साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याने मित्राच्या वाढदिवशी कुणी साप गिफ्ट देतं का? असा प्रश्न आता विचारला जातं आहे.
चिखली शहरातील गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे नामक युवकाचा ५ जुलै रोजी वाढदिवस होता, पारंपारिक पद्धतीने घरात वाढदिवस साजरा केल्यानंतर मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरा करण्यासाठी शेजारील मित्र सर्पमित्र आरिफ खान रईस खान आणि धीरज पंडितकर यांनी संतोषला वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर नेलं, तिथे त्याच्या हाती विषारी साप दिला.
चिडलेल्या सापाने संतोष जगदाळेला जोरदार दंश केला, त्यातच त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. दोन्ही मित्रांनी त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी भरती देखील केलं, मात्र उपचार पूर्ण न करता मित्रांनी रुग्णालयातून त्याची सुट्टी करून घेतली, त्यानंतर संतोषची प्रकृती खालावली आणि त्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला.

संतोषच्या वडिलांनी चिखली शहर पोलीस स्टेशन गाठून संपूर्ण हकिकत कथन करत संतोषच्या हाती विषारी साप देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्पमित्र आरिफ खान रईस खान आणि धीरज पंडितकर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 3 उपकलम पाच अन्वये दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.