जळगाव,(प्रतिनिधी): शिवसेना व भाजप युती असताना एकाही शिवसैनिकाने भाजपशी गद्दारी केली नाही. मात्र, भाजपचा उमेदवार माझ्या विरोधात उभा राहिला. त्याला पक्षाकडून तालुका अध्यक्ष पदाचे बक्षीसही मिळाले, अशी खंत शिवसेनेचे पाचोरा- भडगाव मतदार संघांचे आमदार किशोर पाटील यांनी रविवारी जळगाव येथे महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त करत भाजप नेते गिरीष महाजन व्यासपीठावर असतांना आपली नाराजी व्यक्त केली.
भाजप व शिवसेना युती असताना २०१९ मध्ये शिवसेना उमेदवारां विरोधात भाजपचे उमेदवार उभे होते. त्यावरून आमदार किशोर पाटील यांनी महायुतीच्या मेळाव्यात नाराजी व्यक्त केली. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना युती असताना शिवसेनेसाठी ज्या जागा सोडल्या होत्या तेथे भाजपचे उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहिले. त्यात जिल्ह्यात तर पाचोरा, जळगाव ग्रामीणमध्येही असे प्रकार झाले.
संक्रांतीच्या आदल्या दिवशी महायुतीने संपूर्ण राज्यभर कार्यकर्ता मेळावे आयोजित केले होते, तीन पक्षाचे नेते एकत्र आले पण कार्यकर्त्यांनी देखील एकत्र येउन आगामी निवडणुका लढाव्यात यासाठी समन्वय असण्याकरता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मंत्री ना.गिरीश महाजन, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेषदादा पाटील,आ. किशोरअप्पा पाटील, आ. राजुमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. लताताई सोनवणे,आ. चिमणआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, उमेश नेमाडे, आरपीआयचे अनिल अडकमोल, माजी आमदार दिलीप वाघ आदी उपस्थित होते.आमदार किशोर पाटील बोलतांना पुढे म्हणाले, फडणवीस, शिंदे व अजित पवार यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असायला हवा आपण येणाऱ्या निवडणुका एकत्रित ताकदीने लढू आणि जिंकू असं सांगितलं.
तसेच पाचोरा भडगाव मतदार संघात जे सुरु आहे त्यावर बोलतांना आमदार किशोरअप्पा पाटील यांनी चांगलेच खडे बोल सुनावले,आमचे काही चुकत असेल तर आम्हाला जोड्याने मारा, पण आमच्यात चाललेले वादळ जर कुणाच्याच लक्षात येत नसेल तर हे चुकीचे आहे असं म्हणत त्यांनी मनातील खदखद भजपानेते मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर बोलून दाखवली येणाऱ्या निवडणुका महायुती म्हणून लढवूया आणि प्रचंड बहुमत मिळवूया असं आवाहन त्यांनी यावेळी केले.
दरम्यान मेळाव्याला मार्गदर्शक करतांना भाजपा नेते गिरीश महाजन यांनी किशोरअप्पा पाटील यांच्या नाराजीवर देखील भाष्य केलं असून येणाऱ्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून एकत्र येतं लढणार आहोत, गेल्या वेळेस जे झालं ते यापुढील काळात होणार नाही याची काळजी घेतल्या जाईल असं सांगत त्यांनी आप्पाना अश्वस्त केलं. त्याच बरोबर गिरीश महाजन यांनी नरेंद्र मोदींना पुन्हा २०२४ मध्ये पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीने लढण्याचे आवाहन केले. आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला एकही जागा जिंकता येणारं नाही… खातं सुद्धा उघडता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.