मुंबई : हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असा सुचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे. रविवारी काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला राजीनामा देत मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली.
सर्वात आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिलिंद देवरा यांचे शिवसेनेत मनापासून स्वागत केले. तसेच ते सपत्नीक आल्याने त्यांचेदेखील स्वागत केले. ते म्हणाले की, “कुठलाही निर्णय घेताना शेवटी एका यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते. आपण ज्या भावना व्यक्त केल्यात त्याच भावना दीड वर्षापूर्वी माझ्याही मनात होत्या. जेव्हा कुठलाही निर्णय घ्यायचा असतो तेव्हा बरे वाईट परिणाम होतच असतात. पण धाडस तर करावच लागतं. मी ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं होतं. कारण काही गोष्टी उघडपणे सांगता येत नसतात. काही ऑपरेशन असे असतात ज्यात सुई देखील टोचायला नको. मी डॉक्टर नसतानाही दीड वर्षापुर्वी ऑपरेशन करुन टाकलं.”
“खरंतर काही लोकं असे असतात जे दुर्मिळ असतात. ते पुन्हा भेटत नाहीत. ते स्वत:साठी नाही तर देशासाठी जगत असतात. यातील एक बाळासाहेब ठाकरे आणि मुरली देवरा होते. आज मिलिंद देवरा यांच्या निमित्ताने एक अभ्यासू, सुसंस्कृत, सयंमी आणि मेहनत घेणारा नेता पाहायला मिळाला आहे. काही प्रमुख नेत्यांचा प्रवेश होईल असं मिलिंद देवरांनी सांगितले होते. म्हणजेच हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है,” असे ते म्हणाले. तसेच आरोप प्रत्यारोपांच्या भानगडीत न पडता आपलं काम करत राहायचं, असा सल्लाही त्यांनी देवरांना दिला.
पुढे ते म्हणाले की, “काही लोक कल्याण लोकसभेचा आढावा घेण्यासाठी गेले होते. यावेळी ते निवडणुकीत यांना साफ करा, असं म्हणाले. पण रस्ते साफ करणाऱ्यांना, लोकांची कामं करणाऱ्यांना लोकं कसं काय साफ करतील? ते तर घरी बसणाऱ्यांना साफ करतील,” असा टोलाही त्यांनी लगावला.