मुंबई : अवघ्या देशाच्या नजरा खिळलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येत्या बुधवारी, दि. १० जानेवारीला लागणार आहे. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात सायंकाळी चार वाजता निकालपत्राचे वाचन केले जाणार आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एकूण ३४ याचिका दाखल झाल्या होत्या, त्या ६ गटांत विभागण्यात आल्या. त्यावर १४ सप्टेंबर ते २० डिसेंबर अशी दीर्घकाळ सुनावणी झाली. त्यात ११३ प्रतिवाद्यांची साक्ष नोंदवण्यात आली. सुनावणीअंती २ लाख ११ पानांचा दस्तावेज तयार झाला. हिवाळी अधिवेश समाप्त झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील विधानभवनात या सर्व कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यानंतर सर्व ५४ आमदारांसदर्भात एकत्रित निकालपत्र तयार करण्यात आले आहे.
हे निकालपत्र १ हजार २०० पानांचे आहे. ३४ याचिका सहा गटांत विभागण्यात आल्यामुळे या सहा गटांचे सहा स्वतंत्र निकाल वाचून दाखवले जातील. निकालपत्राचे वाचन करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर केवळ ठळक मुद्दे अधोरेखीत करतील. त्यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांचे याचिकाकर्ते आणि वकिलांना विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात प्रवेश दिला जाईल. संपूर्ण निकालाची प्रत दोन्ही गटांना दिली जाईल.