पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. कार्ला येथील एकविरा देवी ही ठाकरे कुटुंबीयांची कुलदैवत आहे. मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे एकविरा देवीच्या दर्शनाला गेले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकविरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर शिवनेरी किल्ल्यावरही जाणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राज्यातील सत्तास्थापनेनंतर शिवनेरीला जाणार असल्याचे म्हटले होते. सत्तास्थापनेच्या घडामोडींदरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, तसेच, कुलदैवत एकवीरेचेही दर्शन घेईन, असेही ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार ते हा दौरा करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी गडावर मुख्यमंत्री ठाकरे हे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी अथवा मदत निधीबाबत ही घोषणा असण्याची दाट शक्यता आहे.