जळगाव,(प्रतिनिधी)- कला व संस्कृती संचालनालय गोवा, व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट या प्रातःकालीन मैफिलीचे आयोजन बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याला म्हणजे मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. ही प्रातःकालीन सभा महात्मा गांधी उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या मैफिलीस कै. नथू शेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन चे सहकार्य लाभले आहे.
पाडवा पहाट या प्रातःकालीन सभेचे यंदाचे हे २२ वे पुष्प प्रतिष्ठान गुंफत असून गोव्याच्या सांस्कृतिक भूमितुन दोन युवा कलावंतांना प्रतिष्ठान जळगावकर रसिका समोर सादर करणार आहेत.
या वर्षी मुग्धा गावकर व प्राची जठार या दोन प्रतिभा संपन्न युवती आपली कला जळगावकर रसिकांसमोर सादर करणार आहेत. या दोन स्वरसखींना साथ संगत करणार आहेत ऋषिकेश फडके (तबला) दत्तराज सुरलकर (संवादिनी) पंकज सायनेकर (बासरी) तर निवेदन आकाशवाणी पणजीच्या उद्घोषिका मानसी वाळवे या करणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नथू शेठ चांदसरकर ट्रस्टचे अध्यक्ष मेजर नानासाहेब वाणी असतील.
चुकवू नये अशा या प्रातःकालिन मैफिलीसाठी सर्व जळगावकर रसिकांनी यावे व या मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री. सगुण वेळिप, (संचालक, कला व संस्कृती संचालनालय) श्री. अशोक परब (उपसंचालक), सिद्धार्थ गायतोंडे (सांस्कृतिक विभाग प्रमुख) गोवा सरकार तसेच स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम ठीक ६ वाजता सुरू होईल रसिकांना नम्र निवेदन की कृपया ५.५० पर्यंत आसनस्थ व्हावे.