अमळनेर,(प्रतिनिधी): येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त २५ सप्टेंबर रोजी महाभोमयागासह उद्घाटने, लोकार्पण आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. तसेच संबळच्या नादासह मंत्रघोषात जन्मोत्सव सोहळा उत्साह, चैतन्य आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. पहाटे चार वाजता औरंगाबाद येथील किशोर व संतोष उपाध्याय या बंधूंनी सपत्नीक विशेष पंचामृत अभिषेक केला. अत्यंत सुशोभित पाळण्यात प्रतिकात्मकस्वरूप बाल श्री मंगळ देवाचा जन्मोत्सव विधिवतरित्या पार पडला. यंदाच्या ५६ भोगाचे मानकरी उपाध्याय बंधूच होते.
दरवर्षी प्रथेप्रमाणे श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त मंदिरावर नवे ध्वज लावले गेले. ध्वजाचे मानकरी योगेश पांडव यांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नवे ध्वज आणले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, डी. ए. सोनवणे, आनंद महाले, उज्वला शाह, प्रकाश मेखा, विनोद कदम, व्ही. व्ही. कुलकर्णी, औरंगाबाद येथील संजयसिंह चौहान यांनी त्यांचे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वागत केले.
सुवासिनींनी औक्षण केले. याप्रसंगी पावित्र्यतादर्शक परंपरागत वाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संबळवादनाने परिसरात चैतन्य आणि भक्तिमय वातावरण तयार झाले होते. सिन्नर येथील संबळवादक मोहिनी भुसे यांनी आपल्या अनोख्या शैलीत संबळवादन करून ध्वज मंदिरापर्यंत आणले. ध्वजपूजनानंतर त्यांना विधिवतरित्या कळसावर व मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आले. माजी सैनिक असलेल्या मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी ध्वजाला मानवंदना दिली.
श्री मंगळ जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील ‘भव्य व अद्ययावत स्वयंपाकगृहा’चे उद्घाटन, ‘रेडिओ मंगलध्वनी व रेडिओ केबिन’, ‘नवीन अभिषेक बुकिंग कार्यालय’, श्री मंगळग्रह मंदिराचे ग्लासवर्कने केलेले सुशोभीकरण, ‘आय प्रे मंगल’ या कलाकृतीचे लोकार्पण, साप्ताहिक ‘महातेज’ व मासिक ‘मंगल कामना’चे प्रकाशन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, त्यांच्या पत्नी जयश्री पाटील व प्रमुख अतिथींनी केले. तर मंगळग्रह सेवा संस्थेने दत्तक घेतलेल्या अमळनेर बसस्थानक परिसरात शुद्ध व गार पाणीपुरवठा करणाऱ्या ‘श्री मंगळ जलकुंभा’चे उद्घाटन व ‘आगमन व निर्गमन’ भव्य प्रवेशद्वाराचे भूमिपूजन माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, राज्याचे सहपोलीस महासंचालक कैसर खालिद, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, माय एफ.एम. रेडिओचे इंडिया हेड सौरभ वाडेकर, जैन उद्योग समूहाचे व्हाईस प्रेसिडेंट (मीडिया) अनिल जोशी, प्रांताधिकारी महादेव खेडकर, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, राज्य परिवहन महामंडळाचे जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर, अमळनेर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, व्हाईस ऑफ मीडिया (उर्दू विंग) चे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, रोमिफो इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नाईकवाडी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राहुल इधे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील, कवयित्री ज्योती त्रिपाठी (मुंबई) यांच्या हस्ते करण्यात आले.
सायंकाळी पैलाड भागातील ‘श्री मंगळग्रह पोलीस चौकी’चे उद्घाटन सहपोलीस महासंचालक कैसर खालिद व जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी केले.
दरम्यान सर्व उदघाटन प्रसंगी आगारप्रमुख इम्रान पठाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, डॉ. अविनाश जोशी, माधव देवधर, पंकज मुंदडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलीप गांधी, प्रशांत सिंघवी, राजेश नांढा, अनिल रायसोनी, मनीष जोशी, माजी नक्षराध्यक्ष सुभाष चौधरी, भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शीतल देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील, भोजमल पाटील, डॉ. रवींद्र जैन, डॉ. मिलिंद पाटील, अॅड. व्ही. आर. पाटील, डॉ. विजय पवार, प्रदीप अक्षवाल, अनिल शिसोदे, अरुण नेरकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंदिरातील अभिषेक गृहात दीर्घकाळापासून स्पर्धा परीक्षार्थींना मोफत मार्गदर्शन करणारे शिक्षक विजयसिंग पवार व संजयसिंह चौहान यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार इंजि. उन्मेष पाटील यांची उद्घाटन, मार्गदर्शक व प्रकाशक म्हणून विशेष उपस्थिती लाभली. उद्घाटनपर सर्व कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी मंत्री अनिल पाटील होते. यावेळी काही प्रमुख अतिथींनी परस्परांना मारलेल्या कोपरखळ्या तथा हास्य विनोदाने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले. सर्व वक्त्यांनी मुक्त कंठाने मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप बहिरम यांनी आभार मानले.
दुपारच्या सत्रात डॉ. नाईकवाडी, तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी मयूर कचरे, अविनाश खैरनार, कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी, कृषी सहाय्यक योगेश वंजारी, अमोल कोठावदे, मंगळग्रह सेवा संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील यांनी जागर सेंद्रिय शेतीचा या विषयावर आयोजित कार्यशाळेत शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षार्थीना कैसर खालिद, नाशिक येथील करिअर कौन्सिलर राजेंद्र वर्मा, आहारतज्ज्ञ रमा वर्मा यांनी मार्गदर्शन केले.
सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत शहरातील विविध महिला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते पालखी पूजन व मिरवणूक, श्री स्वामी समर्थांची आरती, श्री महादेवांची आरती तसेच श्री मंगळग्रह मंदिरातील विविध आरत्या झाल्या. यावेळी संबळवादक मोहिनी भुसे यांचे संबळवादन उपस्थित भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले. दिवसभर भाविकांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला. वेंकीज ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी शुद्ध गावरान तुपातील मोतीचूर लाडू प्रसादाची मानकरी होती. शहरातील माहेश्वरी समाजाच्या महिलांनी सामूहिक गणपती अथर्वशीर्षपाठ केले.
मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक, प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, अक्षय जोशी, मंदार कुलकर्णी, गणेश जोशी, विनोद पाठक यांनी पौरोहित्य केले. अंकुश जोशी यांनी महायागावेळी नालवर साथसंगत केली.
महाभोमयागाचेही आयोजन
श्री मंगळ जन्मोत्सवाच्या निमित्ताने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत मंदिरासमोरील सभामंडपात महाभोमयागाचे आयोजन करण्यात आले. त्यात खा. शि. मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, ललित अग्रवाल, आशिष अलंकारचे संचालक राजेंद्र वर्मा, श्रीकांत उपाध्याय, किशोर उपाध्याय, जळगावचे उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, हितवर्धन सोनवणे, कलागुरूचे संचालक आशिष गोकलाणी, महावीर एम्पोरियमचे मोतीलाल जैन, सतीश एंटरप्राईजेसचे विनोद अग्रवाल हे सपत्नीक मानकरी होते.