जालन्यात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी व कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी गेल्या ९ दिवसांपासून उपोषण सुरू केले असून आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे दरम्यान बुधवारी ‘आरक्षण मिळालेचं पाहिजे’ म्हणत ३० वर्षीय युवकाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने गावात प्रचंड खळबळ उडाली, या घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस प्रशासन गावात दाखल झाले. त्यांच्यासमोरच गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जोरदार घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत समिती स्थापन केली असून निजामकालीन नोंदी तपासून कुणबी प्रमाणपत्रे देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे घडली आहे. तरुणाने आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणा देत गाव तलावात उडी मारून आपले जीवन संपवले.
किसन चंद्रकांत माने (३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर गावात महसूल, पोलीस प्रशासन दाखल झाले असून ग्रामस्थांच्या जमावाने मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
माडज येथील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, किसन माने मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असे म्हणत होता. बुधवारी दुपारच्या सुमारासही तो याच विषयावर बोलत होता. एका दुकानासमोर बसून आरक्षणावर चर्चा सुरू असताना किसन याने अंगावरील कपडे काढून मी गेलो तरी तुम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे ओरडत गाव तलावाकडे धाव घेतली. क्षणार्धात त्याने पाण्यात उडी टाकली. त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाळात फसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.