जळगाव, (प्रतिनिधी)- शेळी पालनासाठी दुसऱ्या टप्प्यांतील अनुदानाची रक्कम प्राप्त करून देण्याच्या मोबदल्यासाठी ५ हजाराची लाचेची रक्कम स्विकारतांना जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्ती जाती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकासह कंत्राटी पंटरला आज मंगळवार ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा व्यवस्थापक भीमराव लहू नाईक (वय-५५ ) व कंत्राटी सेवक आनंद नारायण कडेवाल (वय-३४) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहे.
सविस्तर असे की, यावल तालुक्यातील तक्रारदार यांनी जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाच्या कार्यालयाकडे शेळी पालनासाठी १ लाख रुपयांचे कर्जाचे प्रकरण दाखल केले. त्यापैकी पहिला हप्ता ७५ हजार रुपयांचा मंजूर झाला व उर्वरीत २५ हजारांचा हप्ता मंजूर करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक भीमराव लहू नाईक यांनी स्वतःसाठी ३ हजार व कंत्राटी सेवक आनंद नारायण कडेवाल यांच्यासाठी २ हजारांची लाच सोमवारी ४ सप्टेंबर रेाजी मागितली होती. मात्र लाच द्यावयाची नसल्याने तक्रार नोंदवण्यात आली व सापळा रचण्यात आला. त्यानुसार मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी कार्यालयातच जळगाव लाचलुचपत विभगाच्या पथकाने संशयितांना लाच घेतांना रंगेहात पकडले आहे.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकुर, राकेश दुसाने यांच्यासह पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक किशोर महाजन, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.













