भुसावळ : उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा सुरु झाल्या आहे. याच दरम्यान, तालुक्यातील अकलूदजवळ असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात गावठी बनावटीचे पिस्तूल सापडले. शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तराची नियमित तपासणीदरम्यान,प्रकार समोर आला. हे पिस्तूल रिकामे असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हे पिस्तूल कुतूहलापोटी बॅगेत आणल्याची कबुली विद्यार्थ्याने दिली आहे.
भुसावळ शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या रेल्वे कर्मचार्याचा मुलगा 2017 पासून अकलूदजवळील पोदार शाळेत शिक्षण घेत असून हल्ली तो नववीच्या वर्गात आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केल्यानंतर नववीच्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरात गावठी कट्टा आढळल्यानंतर शिक्षकांनाही धक्का बसला.
शाळा प्रशासनाला ही बाब कळवल्यानंतर फैजपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ व सहकार्यांनी धाव घेत कट्टा जप्त केला तर विद्यार्थ्यालाही चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संशयित विद्यार्थ्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.