नवी दिल्ली : शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत चर्चा असून अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे.
राज्य सरकारमध्ये अजिबात काही अलबेल नाहीये. अलबेल असतं तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रोखला गेला नसता. एक वर्ष झालं तरी विस्तार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार केंद्राने रोखला आहे. हा विस्तार भाजपने रोखला आहे, असा मोठा दावा करतानाच एकनाथ शिंदे यांच्या हातात काही नाही, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांना धमकीचे फोन आले होते. हा राऊत यांचाच बनाव असल्याचं भाजपकडून म्हटलं गेलंय. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बनाव रचून काय करायचं? असे बनाव मूर्ख लोक रचतात. वर्षभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. मधल्या काळात पुण्यात एक व्यक्ती पकडली. ती रावसाहेब दानवे यांच्या गावातील होती. त्याचा फोटो दानवेंसोबत होता. म्हणून काय दानवेंनी बनाव रचला का? त्या आधी चार व्यक्ती पकडले.
शिंदे हा खुळखुळा झाला आहे. ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्या हातात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे अधिकार आहेत, ना राज्याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार. त्यांना एकच आदेश आहे. भ्रष्ट मंत्र्यांना आधी बाहेर काढा आणि मग विस्तार करा, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.