जळगाव : राज्यात गेल्या अकरा महिन्यापूर्वी राजकीय भूकंप घडून आला होता. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अनेकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीची वाट धरली होती. यात सध्या जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचं तसंच एकनाथ शिंदे आणि भाजपसोबत जाण्याचं कारण सांगितलं आहे.
बंडाच्यावेळी गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जळगाव जिल्ह्याचे पाच आमदार गेले होते, त्यापैकी चार आमदार माझ्याही पहिले पळून गेले. नागपूरचा ही पळून गेला, बुलढाण्याचाही पळून गेला, जळगावचे गेले नाशिकचे गेले, दादर ठाण्याचे सर्वच आमदार शिंदे सोबत गेले. नाशिक ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. मी तर 30 नंबरला गेलो होतो, माझ्याआधी 32 जण गेले होते.
मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं ?सर्वच शिंदे सोबत पळून गेले, चार खांदे गेले तर मी एकटा काय करू?, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
त्यावेळेस मी सत्तेची लालसा केली नाही, मी तर मंत्रिपद सोडून गेलो होतो. माझी आमदारकीही गेली असती.
आम्ही सट्टा खेळलो, हिंदुत्वाकरता सट्टा खेळलो. ज्या भगव्या झेंड्याकरता बाळासाहेबांनी आयुष्य वेचलं, त्या भगव्या झेंड्याला वाचवण्याकरता भाजपसोबत आम्ही गेलेलो आहोत. आम्ही हे पाप केलं असेल तर लोकांनी पाप म्हणावं. आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणाकरता शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तेवत ठेवून भाजपसोबत पुन्हा युती केली, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.