मुंबई : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला तर काेणा काेणाला मंत्रिपद मिळेल याची चर्चा समाज माध्यमातून देखील सुरु आहे. दरम्यान अशातच शिंदे- फडणवीस सरकारला पाठींबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बच्चू कडू म्हणाले. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे मलाही मंत्रिपद मिळणार, असा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे. आमदार बच्चू कडू यांनी सर्वाेच्च न्यायालयातील निकालाबाबत बाेलताना काही गोष्टी सोडल्या तर निकाल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागलेला आहे. हा अपेक्षेप्रमाणे निकाल लागला असून याचा आनंद होत आहे असे म्हटलं.
बच्चू कडू पुढे म्हणाले की, “आता मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण नसावी. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. लोकांची कामे निकाली निघावीत यासाठी लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. एकेका मंत्र्याला पाच ते सहा पालकमंत्रिपद आणि तर खाती दिल्याने लोकांची म्हणावी तशी कामं होत नाहीत. कोणाला मंत्री बनवतात हा नंतरचा भाग पण विस्तार होणं महत्त्वाचं आहे. आता विस्तार झाला नाही तर मग 2024 नंतरच विस्तार होईल असं मला वाटतं.”