नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवलं आहे. तसेच जर तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही पूर्वस्थिती लागू करुन सरकार पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिले असते, असं सगळ्यात मोठं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर गेले १० महिने सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा न्यायालयीन निर्णय आज, गुरुवारी देण्यात आला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने यावरील ऐतिहासिक व दूरगामी निकाल दिला.
शिवसेनेवरील हक्कावरून देखील मोठं विधान
या निकालदरम्यान, न्यायालयाने शिवसेनेवरील हक्कावरून देखील मोठं विधान केलं आहे. मीच खरी शिवसेना असा दावा कुणी करू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोर्टाच्या या निरीक्षणामुळे शिंदे गटाला मोठा झटका बसला असून निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.