जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसगिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातमुळे कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास/त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता जळगाव जिल्ह्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य (आई-वडील शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही 1 व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जणांकरीता ‘‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान’’ योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेतअतंर्गत अपघाती मृत्यू करीता- रु.2 लाख, अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय निकामी झाल्यास रु. 2 लाख, अपघातामुळे 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी झालयास रु.2 लाख, अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास रु.1 लाख याप्रमाणे अनुदान देण्यात येते.
या योजनेच्या लाभासाठी प्रस्तावासोबत तहसिलदार कार्यालयाकडुन 7/12 उतारा, 8-अ, गाव नमुना नंबर 6-ड, गाव नमुना नं 6-क, प्रांत कार्यालयाकडील पोलीस अंतिम अहवाल, जिल्हा पोलीस विभागाकडील प्रथम खबर अहवाल (FIR), घटनास्थळ पंचनामा (SPOT Report), मरणोत्तर पंचनामा अहवाल (INQUEST), पोस्टमाटर्म अहवाल (Postmortem Report), व्हीसेरा रिपोर्ट (Viscera Report) तसेच शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल. तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी, शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकरी यांचेकडे 30 दिवसाच्या आंत सादर करावा.
जळगाव जिल्ह्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना शासन निर्णयानुसार 19 एप्रिल, 2023 पासून प्रथम तीन वर्ष राबविण्यात येत आहे. तरी या अपघात योजनेत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.