जळगाव- हरियाना येथे झालेल्या ‘हार्मोनी २०१९’ या १३ व्या आंतरराष्ट्रीय युवक शिबीर आणि सांस्कृतिक महोत्सवात पार पडलेल्या युवा संसदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून सर्वोत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल जळगावचे विराज अशोक कावडीया यांचा प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास खेर यांनी पारितोषिक देऊन गौरव केला.
महोत्सव २३ नोव्हेंबर ते १ डिसेम्बर दरम्यान कर्नाल येथे डॉ. मंगल सेन हॉल येथे होत असून यात देशासह रशिया, सिंगापूर, मलेशिया, व नेपाळ यासह विविध देशातील ३ हजार ८७६ तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट्स अँड ऍक्टिव्हिटीस (निफा) याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खत्तर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल निशांक, ओरिसाचे राज्यपाल प्रा.गणेशीलाल, कर्नालचे खा.संजय भाटीया, रोहतकचे खा.अरविंद शर्मा, हरियानाचे राज्यमंत्री संदीप सिंग,जिल्हाधिकारी विनय प्रताप सिंग आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महोत्सवात युवक संसद उपक्रम घेण्यात आला. यात २२ राज्यातील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. विरोधी पक्षनेत्याची भूमिका विराज कावडिया यांना करायला मिळाली. त्यात त्यांनी प्रतीकात्मक सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल करीत शासनाच्या विविध निर्णयाची पोलखोल केली. विराज कावडिया यांचा आक्रमक पवित्रा आणि अभ्यासूपणा या गुणांमुळे सर्वोत्कृष्ट विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना गायक पद्मश्री कैलास खेर यांनी गौरविले. यावेळी ‘निफा’ संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. भारत जेठवानी उपस्थित होते. विराज कावडिया हे युवाशक्ती फौंडेशनचे संस्थापक आहेत. त्यांच्यासह जळगावातील संदीप सूर्यवंशी, मनजित जांगीड, विनोद सैनी, उमाकांत जाधव, प्रशांत वाणी हे सदस्य सहभागी झाले आहेत.