मुंबई – मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो आणि आहे हे याआधीच सांगितलं आहे. मला पक्षातून काढलं का? त्यामुळं बंड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही तसं कुठे ऐकलं किंवा वाचलंय का? मी राष्ट्रवादीसोबतच आहे आणि शरद पवार हेच आमचे नेते आहेत, असं अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अजित पवार यांच्या बंडामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अजित पवार यांचं मतपरिवर्तन करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक तऱ्हेने प्रयत्न केले. पवार कुटुंबातील सदस्य आणि पक्षाचे ज्येष्ठ नेतेही त्यांच्या भेटीला गेले होते. अखेर अजित पवार यांचं मन वळवण्यात त्यांना यश आलं. मतपरिवर्तन झाल्यानंतर त्यांनी काल दुपारी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काल रात्री शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अजित पवार यांच्या भूमिकेमुळं गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण पूर्ण ढवळून निघालं होतं. त्यांची भूमिका आणि बंड याबाबत आज त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली. त्यावेळी मी राष्ट्रवादीतच आहे आणि होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.