जळगाव: चोपडा शहरात रंगराव आबा नगरात एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गिरीश झुलाल पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येच्या आदल्या दिवशी गिरीशने पोस्टमार्टम करणाऱ्या मित्राची भेट घेतली. माझे पोस्टमार्टम तुलाच करायचं आहे. जरा सांभाळून कर, डोकं जास्त फाडू नको आणि माझ्या आईला माझी छिन्नविच्छिन्न केलेली बॉडी दाखवू नको असे सांगितले.आत्महत्येपूर्वी मध्यरात्री बाराच्या सुमारास तरुणाने त्याच्या व्हाट्सअप वर चल बाबू, बाय असं स्टेटस ठेवल्याचेही समोर आले आहे.
गिरीश हा रुग्णवाहिका चालक असल्याने त्याची चोपडा उपजिल्हा रुग्णालयात चांगली ओळख होती. तर याच रुग्णालयात शवविच्छेदन करणारा प्रशांत पाटील (मामू) हा गिरीश याचा चांगला मित्र होता. आत्महत्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दुपारी गिरीश हा उपजिल्हा रुग्णालयात प्रशांत पाटीलला भेटला होता. उद्या तुलाच माझेच पोस्टमार्टम करायचे आहे, सांभाळून करशील. डोकं जास्त फाडू नको आणि माझ्या आईला माझी छिन्नविच्छिन्न केलेली बॉडी दाखवू नको, असेही गिरीशने प्रशांतला सांगितले होते.
गिरीशचे म्हणणे प्रशांतने मनावर घेतले नाही. जास्त बडबड करु नको. आपले काम कर असे प्रशांत गिरीशला म्हणाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी गिरीश आत्महत्या करेल अशी पुसटशीही कल्पना प्रशांतने केली नव्हती. मात्र गिरीशचे शब्द तंतोतंत खरे ठरले. दुसऱ्या दिवशी गिरीशचा मृतदेह प्रशांतकडे शवविच्छेदनासाठी आला. मित्राच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची वेळ प्रशांतवर आली. प्रशांतने काळजावर दगड ठेऊन, थरथरत्या हातांनी मित्राच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
एकुलता एक आणि कर्त्या मुलाच्या मृत्यूने आईचा आधार हरवला
गिरीश त्याच्या परिवारातील एकुलता एक मुलगा होता. गिरीशच्या वडिलांचे निधन झाले आहे. गिरीश याच्या पश्चात आई आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. एकुलता एक व कर्ता मुलगा असलेल्या गिरीशच्या मृत्येने त्याच्या आईचा आधार हरवला आहे. आता जगायचे कसे या विचाराने ती सुन्न झाली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात गिरीशवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. गिरीशने प्रेमभंगातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.