चोपडा : चोपडा तालुका तरुणाच्या खुनाच्या घटनेने हादरला आहे. गावातील तरुणाचा धक्का लागल्याने आरोपी तरुणाने आणि त्याच्या कुटुंबाने एकाची हत्या केली आहे.भोजू वासुदेव कोळी (वय ३२, रा. विरवाडे ता. चोपडा) असं मयताचं नाव असून याबाबत पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकी काय आहे घटना?
तालुक्यातल्या विरवाडे गावातील रहिवाशी तरुण भोजू कोळी आणि गावातील दिपक कोळी यांचा एकमेकांना धक्का लागल्यावरुन वाद झाला होता. या वादातून २ मार्च रोजी रात्री भोजू कोळी याच्याकडे सागर देविदास कोळी, दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी आणि शोभाबाई देविदास कोळी (सर्व रा. विरवाडे ता.चोपडा) हे गेले.
त्यांनी भोजू कोळी आणि त्याचा भाऊ राजेंद्र कोळी यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. यादरम्यान भोजू कोळी आणि राजेंद्र कोळी यांना शिवीगाळ दमदाटी तसेच धक्काबुक्की केली. यात सागर कोळी याने भोजू कोळी याचा भाऊ राजेंद्र कोळी याच्या कपाळावर दगड मारून डोके फोडून दुखापत केली.
त्यानंतर सागर कोळी, शोभाबाई आणि वासुदेव कोळी यांनी भोजू यास शिवीगाळ, दमदाटी लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सागर कोळी याने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने भोजू कोळी याच्या मानेजवळ तसेच पाठीवर आणि इतर ठिकाणी भोसकून गंभीर दुखापत केली. जखमी अवस्थेत भोजू कोळी याला चोपडा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान भोजू कोळी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी शुक्रवारी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन एका महिलेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.