मनसे नेते संदीप देशपांडे हे शुक्रवारी पहाटे शिवाजी पार्क परिसरात मॉर्निग वॉकसाठी गेले असता यावेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. दरम्यान, संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला असून शोधासाठी तब्बल आठ पथकं तैनात केली आहेत.
व्हिडीओत काय आहे?
संबंधित सीसीटीव्हीत एक आरोपी हातात स्टंप घेऊन जाताना दिसत आहे. काही आरोपींनी मास्क घातलेले दिसत आहे. हल्ल्यानंतरचे हे फुटेज असल्याचं सांगितलं जातंय. एक आरोपी मध्येच टाकून पळतानाही दिसतोय. हल्ल्यानंतर पळत असतानाचा हा सीसीटीव्ही आहे. आरोपी हे टॅक्सीमधून आले होते आणि टॅक्सीमधून पळून गेले, असं पोलीस चौकशीत समोर आलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपने हल्ला करणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज#SandeepDeshpande #ViralVideo #MumbaiPolice #MNS #RajThackeray pic.twitter.com/XAqGtfWCrJ
— Satish Daud Patil (@Satish_Daud) March 4, 2023
नेमकं काय घडलेलं?
मनसे नेते संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. नेहमी त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र शुक्रवारी ते एकटेच होते. ही संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टम्प आणि रॉड होते. त्यांनी संदीप देशपांडे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.