जळगाव : शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. बंडानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि बंडखोर आमदारांनी भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन केलं. मात्र, बंडाळीवेळी शिवसेनेतील एक मोठं नाव, आमदार जे आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंसोबत होते, पण दुसऱ्याच दिवशी थेट गुवाहाटीला जाऊन पोहोचले. ते आमदार म्हणजे, मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहाटी गाठल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला होता. पण, आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहोचले? याचं गुपित खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावच्या सभेत बोलताना उघड केलं आहे. गुलाबराव पाटील यांना माझ्यासोबत येताना खूप अडचणी आल्या. ते कसे आले ते मी सांगत नाही. मात्र जिद्द व चिकाटी असली की ते ध्येय साध्य होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यांची तब्येत बरोबर नसतानाही मंत्री गुलाबराव पाटील यांना आणण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण, गिरीश महाजनांनी प्रयत्न केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. ॲम्बुलन्सद्वारे मंत्री गुलाबराव पाटील यांना नेण्यात आल्याचा गौप्यस्फोटही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला. त्यांनतर जे काय घडलं ते सर्व जगाला माहित आहे. आणि तेव्हापासून लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत लोकांना माहीत झालं की एकनाथ शिंदे कोण आहे ते, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगत गुवाहाटी दौऱ्याचा उल्लेख केला.
तुम्ही हा कार्यक्रम घेतला असता तर आम्ही एक दोघं जण आलो असतो. पण इंजीन आल्यामुळे सगळे डबे आले. गिरीश महाजनांनाही धावत पळत यावं लागलं. मला तर माहितीही नव्हतं, मुख्यमंत्री येणार ते. साडेदहा अकरा वाजता किशोर अप्पा पाटील यांनी फोन केला. म्हणाले जमतं की नाही जमतं, मला माहित नाही. पण जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला. मुख्यमंत्री येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मग आता पळावं लागेल, असं मी स्वतःला म्हटलं. सगळ्यांची धावपळ उडाली. फक्त चार तासांत सर्व तयारी झाली. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोठी तारांबळ उडाली. इतक्या वेगात तयारी झाली की आम्हालाही विश्वास बसेना. पण खरंच मानावं लागेल तुम्हाला. म्हणून तर सरकार आलं, आता लक्षात आलं माझ्या, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.