जळगाव : जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशातच चोरीची एक धक्कादायक घटना समोर आलीय. धरणगाव तालुक्यातील रेल गावात मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांने वृध्द महिलेचे कान कापून 10 ते 12 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील रेल गावच्या रहिवाशी असलेल्या विमलबाई श्रीराम पाटील (वय-70) ह्या गावातील मंगल नथ्थू पाटील याच्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्याला आहे. 29 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटा घरात चोरीच्या इराद्याने घुसला. दरम्यान, विमलबाई पाटील या खाटीवर झोपलेल्या होत्या. अज्ञात चोरट्याने त्याच्या घरात घुसून त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने असल्याने त्याने थेट वृध्द महिलेचा कानच कापला.
तसेच वृध्द महिलेच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. 25 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून पसार झाला. दरम्यान आजी उठल्या नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या महिला घरी गेल्याने हा प्रकार उघडकीला आला. जखमी झालेल्या वृध्द महिलेला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.