पाचोरा,(प्रतिनिधी)- तालुक्यातील अंतुर्ली खु” प्र. पा. येथील गिरणा नदी पात्रातुन अवैधरित्या वाळुचा उपसा करुन वाळुचा ढिग आढळून आल्याने महसूल विभागाच्या पथकाने वाळू जप्त करीत मोठी कारवाई केली असून या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाचोरा तहसीलदार श्री. चावडे यांच्याशी ‘नजरकैद’ च्या प्रतिनिधीने संपर्क केला असता ते म्हणाले की, कारवाई कायदेशीर केली आहे, उपलब्ध वाळू साठ्याचा अंदाजित पंचनामा करण्यात आला आहे आणि नंतर शासकीय कामाच्या ठिकाणी वाळू देण्यात आली असल्याचं स्पष्टीकरण दिलं.
याबाबत तलाठी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादी नुसार प्राप्त माहिती अशी की, अंतुर्ली खु” प्र. पा. येथील स्मशानभूमी जवळील गिरणा नदी पात्रातुन विना नंबर चे ट्रॅक्टर व जे. सी. बी. च्या साहाय्याने सुमारे ५२ ब्रास वाळू (सुमारे ५२ हजार रुपये किंमतीची) लबाडीच्या इराद्याने चोरुन ढिग घालुन ठेवल्याचे १६ डिसेंबर रोजी निदर्शनास आल्याने सचिन पाटील व त्यांचे सोबत पाच विना नंबर चे ट्रॅक्टर व ट्रॅक्टर वरील अज्ञात चालक, एक विना नंबर प्लेट असलेले जे. सी. बी. व त्यावरील अज्ञात चालक यांचे विरुद्व पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करित आहे.
त्या अवैध वाळूशी संबंध नाही – सचिन पाटील
अंतुर्ली खु” प्र. पा. येथे आढळून आलेल्या अवैध वाळू साठ्याशी माझा कुठलाच संबंध नसतांना निव्वळ माझे वाहने मी शेतात लावल्याचे असल्याच्या संशयावरून माझ्यावर खोटा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माझ्याकडे पाच सहा वाहने असल्याने घरी लावायला जागा नाही म्हणून शेतात लावलेले असतात असं असतांना वाळू साठ्यावर कारवाई साठी आलेल्या पथकाने वाळू जमा करण्याचे सांगितले… माझा संबंध नसल्याचे सांगूनही कारवाईसाठी प्रयत्न सुरु असल्यानेचं माझी वाहने मी शेतातून काढली, मात्र वाहने पळवून नेली व अवैध वाळू साठा प्रकरणी माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचे सचिन पाटील यांनी नजरकैद शी बोलतांना सांगितले.