जळगाव (प्रतिनिधी) : शिक्षक व पालक यांचा विद्यार्थ्यांशी सुसंवाद व्हावा. या सुसंवादातून विद्यार्थ्यांचा विशिष्ट विषयातील आवड जोपासली गेल्यास, त्यातून उद्याचा उत्तम सुशिक्षीत व सुसंस्कृत भारतीय नागरिक घडू शकतो. शिक्षक – पालक – विद्यार्थी सुसंवादावर आज (दि.११) रोजी अमेरिकेतील प्रोफेसर डॉ.वृध्दगिरी गणेशन यांच्या विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
रोझलँड शाळेचे शैक्षणिक सल्लागार, हैदराबाद येथील (ईएफएल) विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू सध्या अमेरिकेत कार्यरत असणारे प्रोफेसर डॉ. वृद्धगिरी गणेशन यांचे इफेक्टीव्ह कम्युनिकेशन या विषयावर विनामूल्य व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान रोझलॅण्ड इंग्लिश मिडीयम येथे आज (दि.११) दुपारी १ ते २ च्या दरम्यान होणार असून, यासाठी सर्वांना प्रवेश खुला आहे. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रोजमीन खीमानी प्रधान यादेखील उपस्थित राहणार आहेत.
शिक्षणक्षेत्रातील मान्यवर असे नाव असलेल्या प्रोफेसर डॉ.वृध्दगिरी गणेशन यांनी १९७५ ते २००७ दरम्यान हैदराबाद येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट येथे इंग्रजी व परदेशी भाषा जर्मनचे शिक्षकांना प्रशिक्षण दिले असून, २००७ ला ते अमेरिकेत गेले. तेव्हापासून अटलांटातील एमोरी युनिर्व्हसिटी तसेच जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटी आणि जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे २०१३ पर्यंत त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ पालक व शिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.