अहमदाबाद : गुजरातमधला जामनगर जिल्हा एका घटनेने हादरला आहे. एका 12 वर्षांच्या मुलाचा खून झाल्याचं आढळलं आहे. या घटनेमध्ये मुलाचे प्रायव्हेट पार्ट कापल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. पंकज दामोर असं खून झालेल्या अल्पवयीनं मुलाचं नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हा मूळचा मध्य प्रदेशातल्या अलीराजपूर जिल्ह्यातला एका गावचा रहिवासी होता. त्याचे आई-वडील गेल्या सहा वर्षांपासून जामनगर जिल्ह्यातल्या बेराजा गावात शेतमजूर म्हणून काम करतात. पंकज त्यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो मंगळवारी (6 डिसेंबर) सायंकाळपासून बेपत्ता होता. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला होता; मात्र रात्र उलटून गेली तरी तो घरी परतला नाहीत. मुलाचे आई-वडील काम करत असलेल्या शेताजवळच बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.
जामनगर जिल्ह्यातल्या पंचकोशी विभागीय पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वैयक्तिक वैमनस्यातून मुलाची हत्या झाली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे इन्स्पेक्टर आर. के. करमटा म्हणाले, “मुलाच्या शरीरावरच्या जखमा पाहता असं दिसतं, की ऊस तोडण्यासाठी वापरल्या जात असलेल्या बिल हुकचा वापर या प्रकरणात हत्यार म्हणून करण्यात आला आहे. मुलाच्या डोक्यावर या शस्त्रानं केलेल्या दोन जखमा दिसत आहेत. त्याचा प्रायव्हेट पार्टही कापण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतरच अधिक माहिती समजेल.”