मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे 50 आमदार तसेच 12 खासदार गुवाहाटीला जाणार असून कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. मात्र, यातील काही आमदार आणि खासदार जाणारा नाहीय. काहींचे नियोजित कार्यक्रम आणि घरगुती कार्यक्रम असल्यामुळे काही आमदारांनी गुवाहाटीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींना बदनामीची भीती वाटत आहे तर काहींची शिंदे यांच्यावर नाराजी असल्याने त्यांनी या दौऱ्यापासून दूर राहणं पसंत केलं आहे.
विशेष म्हणजे हा दौरा आधी 21 नोव्हेंबर रोजी होणार होता. मात्र, सर्वांच्या सोयीसाठी ही तारीख बदलून 26 नोव्हेंबर करण्यात आली. त्यानंतरही काही आमदार गुवाहाटीला जाणार नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काही मंत्री त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने ते गुवाहाटीला जाणार नाहीत.
तर काही आमदार नाराज असल्याने हा दौरा करत नसल्याची चर्चा आहे. तर काही बदनामीच्या भीतीने जात नसून ढोबळ कारणे पुढे करत असल्याची चर्चा आहे. एकूण तीन मंत्री आणि तीन आमदार या दौऱ्याला जाणार नाहीत. शिंदे गटाचे आमदार दादा भुसे, आमदार संजय गायकवाड आणि सुहास कांदे दोघेही गुवाहाटीला जाणार आहेत. तथापि शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा नाशिक दौरा अचानक आल्याने ते गुवाहाटीला जाणार नाही अशी माहिती आहे. सत्तार हे गुवाहाटीला जाणार नसल्याने एकच चर्चा रंगली आहे.
पाचोरा येथील आमदार किशोर पाटील गुवाहाटीला जाणार आहेत. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हेही गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा गुवाहाटीला जाणार नाहीत. ते जळगावमध्येच थांबणार आहेत. तर आमदार लताताई सोनवणे या गुवाहाटीला जाणार की नाही हे अनिश्चित आहे.
मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील गुवाहाटीला जाणार नाहीत. महत्त्वाची कामे आणि लग्न समारंभामुळे ते गुवाहाटीला जाणार नाहीत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आज दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यात आहेत. 27 व 28 तारखेला त्यांच्या परंडा मतदारसंघात आरोग्य शिबीर असल्याने ते गुवाहाटीला जाणार नाहीत.