मुंबई – शिंदे गटाचे २२ आमदार नाराज असून यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असा दावा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या रोखठोक सदरातून करण्यात आल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. आता नेमकं ते नाराज २२ आमदार कोण? कोण कोण भजपात जाणार या विषयावर चर्चा होतं आहे मात्र शिंदे सरकार मधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी असं काहीही नसल्याचे माध्यम प्रतिनिधीना सांगितलं आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून राज्यपालांवर आणि शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. ‘भारतीय जनता पक्षाने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले. सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस घेतात व मुख्यमंत्री शिंदे ते निर्णय जाहीर करतात. आता दिल्लीला सुद्धा फडणवीस एकनाथ शिंदेंशिवाय जातात’, असा टोला सेनेनं लगावला.
मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल…
मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने म्हटलं आहे.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले….
शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते, असा दावा शिवसेनेनं केला होता. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपले राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच हे वक्तव्य केल जात असल्याचं म्हणत गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावरच निशाणा साधला आहे.