मुंबई – राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उपलब्ध ८८९ ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक ३९७ ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नंबर वन पक्ष ठरला आहे. या यशाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सांगितले.
ते म्हणाले की, सोमवारी मतगणनेनंतर जिल्ह्याजिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना युतीला एकूण ४७८ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला असून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना एकूण मिळालेल्या २९९ ग्रामपंचायतींपेक्षा युतीचे संख्याबळ खूप जास्त आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने नव्या सरकारला आणि भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल दिला आहे. आपण मा. एकनाथ शिंदे व मा. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो.
त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळत आहे. त्यांच्या विकासाच्या कामगिरीला जनतेची पुनःपुन्हा पसंती मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही हेच दिसून आले आहे.