जळगाव – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जळगावतर्फे 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान तिनदिवसीय शहीद पदमश्री डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यानमाला घेण्यात येणार असून विविध विषयावर वैचारिक मांडणी तज्ज्ञ वक्ते करणार आहे.
शहीद पदमश्री डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 1 नोव्हेंबर जन्मदिनानिमित्त व्याख्यानमाला घेण्यात आली आहे. व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष आहे. संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत व.वा.वाचनालयाच्या टिळक सभागृहात ही व्याख्यानमाला आयोजित आहे. आज पहिल्या दिवशी इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.नितीन शिंदे हे सफर खगोल विश्वाची या विषयात खगोलशास्त्रासह फलज्योतिषाची माहिती देणार आहेत.
दुसऱ्या दिवशी नाशिक येथील सामाजिक अभ्यासिका दीप्ती राऊत ह्या ‘महिला आणि अंधश्रद्ध मानसिकता’ याविषयी मांडणी करतील. तर रविवारी अंतिम दिवशी औरंगाबाद येथील जेष्ठ पत्रकार संजय आवटे हे ‘सामाजिक विवेकवाद : पत्रकारितेच्या आरशातून’ याबाबत विश्लेषण करतील. तिन्ही दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून नेमिवंत धांडे, अनिल कांकरिया, यशवंत बारी, राज्य पदाधिकारी डॉ.प्रदीप जोशी, जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अजय शास्त्री उपस्थित राहतील.
व्याख्यानमालेसाठी मराठी विज्ञान परिषद सहकार्य लाभत असून नागरिकांनी वेळेवर उपस्थिती द्यावी असे आवाहन व्याख्यानमाला समन्वयक विश्वजीत चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, शहराध्यक्ष अश्फाक पिंजारी आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.