मुंबई : सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होईल. पुढील महिन्याच्या म्हणजेच एक ऑक्टोबर 2022 पासून बँकिंगपासून इतर नियमांत बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम सगळ्यांवर होणार आहे. पुढील महिन्यापासून डेबिट, कार्ड वापराबाबतही नियम बदलणार आहे. त्याशिवाय, डिमॅट अकाउंटबाबतही महत्त्वाची नियम लागू होणार आहे.
Card Tokenisation नियम लागू
एक ऑक्टोबरपासून आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे. देशभरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल करणार आहे. या पूर्वी हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार होता, पण RBI ने ही मुदत सहा महिन्यांसाठी वाढवून 30 जून केली होती. नंतर आरबीआयने 1 ऑक्टोबर 2022 पासून हा नियम लागू करण्याचे निश्चित केले.
Card Tokenisation चा फायदा काय?
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा व्यवहार 16-अंकी कार्ड क्रमांक, कार्डची मुदत, सीव्हीव्ही आणि ओटीपी नमूद करावा लागतो. त्यानंतर व्यवहार पूर्ण होतो. जेव्हा कार्ड तपशील एन्क्रिप्टेड पद्धतीने संग्रहित केले जातात तेव्हा फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. टोकनायझेशनमध्ये तुमच्या कार्डची माहिती एका पर्यायी कोडमध्ये रूपांतरित केली जाईल. या कोडच्या मदतीने पेमेंट करणे शक्य होणार आहे.
अटल पेन्शेन योजनेचा फायदा मिळणार नाही?
अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची लोकप्रिय योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते. एक ऑक्टोबरपासून या योजनेत बदल होणार आहे. नव्या नियमांनुसार, आयकर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही करदाते असाल तर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची संधी आहे. सध्याच्या नियमानुसार वय 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंतच्या वयाची कोणतीही व्यक्ती या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकते.
डिमॅट अकाउंट
शेअर मार्केटमधील व्यवहारासाठी डिमॅट अकाउंट आवश्यक असते. अनेकजण शेअर बाजारात व्यवहार करतात. आता डिमॅट अकाउंटधारकांसाठी Two Factor Authentication करणे आवश्यक आहे. तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये Two Factor Authentication चा पर्याय 30 सप्टेंबरपर्यंत Enable करावा लागणार आहे. त्याशिवाय, तुम्हाला तुमचे डिमॅट अकाउंट सुरू करता येणार नाही.
हे पण वाचा :
सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करताय? या योजनेत 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 28 लाखाचा परतावा
नवरात्रीपूर्वी सोने महागले, चांदी झाली स्वस्त ; जाणून घ्या आठवडाभरातील सराफा बाजाराची स्थिती
पोस्टाची ‘ही’ योजना तुम्हाला बनवेल लखपती ; फक्त तीन वर्षातमिळतील 10 लाख
रेपो दरात वाढ?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण आढावा बैठक येत्या आठवड्यात होणार आहे. रिझर्व्ह बँक 30 सप्टेंबर रोजी व्याज दर जाहीर करणार आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जे महाग होणार आहेत.
एलपीजी गॅस दरात वाढ?
एलपीजी गॅस सिलेंडरचे दर एक ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. दर महिन्याला व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर होतात.