विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी नव्या सरकारच्या स्थापनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. शिवसेनेनं अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. तर, भाजपनं मुख्यमंत्रीच काय, महत्त्वाची खातीही देण्यास नकार दिल्यानं गाडं अडलं आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये केवळ कलगीतुरा रंगला आहे. भाजप वर्चस्ववादाचं राजकारण करत असल्यानं शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. कोणीही मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानं हा पेच अधिकच वाढला आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्राच्या वाटाघाटीतून अंग काढून घेतलं असून राज्यातील नेत्यांनाच पेच सोडवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, शिवसेना ऐकत नसल्यानं भाजपनं राष्ट्रपती राजवटीचं अखेरचं अस्त्र बाहेर काढलं आहे. भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असं म्हटलं आहे. अर्थात, एक-दोन दिवसांत चर्चेला सुरुवात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास सत्ता पर्यायानं भाजपच्याच हातात राहणार आहे व नंतर भाजपला त्यांचा अजेंडा राबवता येणार आहे. जम्मू-काश्मीर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्याशी पटत नसल्यानं भाजपनं त्यांचं सरकार काढून तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली आणि पुढं या राज्याचं विभाजन करून तेथील ३७० कलम रद्द करून टाकलं. हा अनुभव असल्यानं शिवसेना आता नेमकी कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.