मुंबई : राज्यात शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत नवीन सरकार स्थापन केलं असून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहे. मात्र नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झाला नाहीय. दरम्यान अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर गेले असून त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
ही बैठक रात्री अडीच वाजेपर्यंत सुरू होती. यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यात शिंदे गटाने ८ कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याचं समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाने ८ कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपदांची मागणी केली असून उर्वरीत २९ मंत्रिपदे भाजपने घ्यावीत, असा प्रस्ताव आहे. एकनाथ शिंदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. जे पी नड्डा तसंच मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचीही ते भेट घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ते खास विमानाने पुण्याला परतणार आहेत.