मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं असं मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं असून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
उद्या(गुरूवारी) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला दिले आहेत. त्यामुळे आजचा दिवस ठाकरे सरकारसाठी निर्णायक ठरणार आहे.
शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी बंडखोर आमदारांनी पाठिंबा काढल्याचा दावा न्यायालयात केला होता. त्यामुळे ठाकरे सकारनं बहुमत गमावलं असं मानलं जात आहे.
याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपने महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर राज्यपालांनी हे पत्र लिहलं आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर आता उद्धव ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल.
दरम्यान, आम्ही उद्या मुंबईत जाणार आहोत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये दिली आहे. शिंदे यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.