मुक्ताईनगर: – तालुक्यातील चारठाणा येथे २२ वर्षीय युवकाच्या खाटेखाली जिलेटीनचा स्फोट घडवून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. आकाश राजू वरखेडे (वय २२) या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर असे की, आकाश हा आपल्या अंगणात खाटेवर झोपलेला असताना एका अज्ञात व्यक्तीने जिलेटीनची कांडी त्याच्या खाटेखाली लावून स्पार्किंग करत स्फोर्ट घडवून आणला. त्यात आकाश हा जागीच ठार झाला. या स्फोटमुळे संपूर्ण गावात हादरा बसला व गावकऱ्यांनी स्फोट झाल्याच्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिसांनी जाऊन तपासणी केली. यात एका व्यक्तीच्या घरात जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्याने त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. संबंधितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. गावात पोलिसांचा ताफा असून घटनास्थळी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मयत आकाश वरखेडे यास मुक्ताईनगर जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.