मुंबई : भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. अनेक ठिकाणी तापमानाच्या पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. जळगाव जिल्ह्यातील पारा देखील देशातील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकावर नोंदवला गेला आहे . काल जळगावातील पारा ४५.६ अंशावर नोंदविला गेला आहे. दरम्यान 2 मे पर्यंत विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यंदाचा एप्रिल महिना देशातील उकाड्याचे सर्व विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. भारतातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण एप्रिल होण्याच्या मार्गावर आहे. साधारणपणे मे महिन्याच्या मध्यानंतर जेवढं तापमान असतं तेवढं तापमान एप्रिल महिन्यात वाढलं आहे.
2 मे पर्यंत पूर्व, मध्य आणि वायव्य भारतात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, पश्चिम बंगाल, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट राहिल. हवामान विभागाने पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उर्वरित वायव्य भारत आणि मध्य भारतासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.